FYJC Admission: अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी – fyjc admission last chance for student of online process( प्रगत भारत । pragatbharat.com)

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची शेवटची संधी मिळणार आहे. माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून तिसरी आणि अंतिम विशेष फेरी राबवली जाणार असून, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना १९ आणि २० सप्टेंबर दरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येईल. तिसऱ्या विशेष फेरीची निवड यादी २३ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.

माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या; तर दोन विशेष फेऱ्या अशा एकूण पाच फेऱ्या राबविण्यात आल्या. तरीही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नसल्याने आता तिसरी आणि शेवटची विशेष फेरी राबवली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १९ आणि २० सप्टेंबरला अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतिक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येईल; तसेच गरज असल्यास प्रवेश रद्द करून पुन्हा प्रवेश अर्जाचा भाग दोन, पसंतिक्रम भरून या फेरीत सहभागी होता येईल. २१ सप्टेंबरला भरलेला अर्ज प्रमाणित करून घ्यावा लागेल. तिसऱ्या फेरीची निवड यादी २३ सप्टेंबरला जाहीर होईल. २३ आणि २४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे आदी प्रक्रिया पार पडणार आहेत.

विशेष फेरीमध्ये दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, एटीकेटी सवलतप्राप्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. यापूर्वी अर्ज भरलेले आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याने नव्याने संमती देणे आवश्यक असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग दोन ‘अनलॉक’ करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतिक्रम पुन्हा भरून अर्ज लॉक करणे गरजेचे आहे. एटीकेटी सवलतप्राप्त विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाठी अर्ज भरताना सहाशेपैकी मिळालेले गुण भरावेत. तिसरी विशेष फेरी ही शेवटची फेरी असेल. यानंतर कोणतीही फेरी होणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

OBC विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, प्राधान्य क्रमवारीचे बदललेले निकष जाणून घ्या
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रवेशांची सद्यस्थिती

एकूण महाविद्यालये : ३१६

प्रवेशांसाठी उपलब्ध जागा : एक लाख ११ हजार २३०

आतापर्यंत झालेले प्रवेश : ७१ हजार १५४

रिक्त जागा : ४० हजार ७६

वर्ग तातडीने सुरू करा!
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यांचे वर्ग तातडीने सुरू करा, अशा सूचना माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कॉलेजमध्ये सामावून घेऊन त्यांचे नियमित वर्ग सुरू करावेत, असे पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

FYJC Admission: अकरावीला ६,७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश

Related posts