आरेतील रस्ते देखभालीसाठी महापालिकेकडे सोपवा : रवींद्र वायकर( प्रगत भारत । pragatbharat.com)

आरेतील अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी पशु व दुग्ध व्यवसाय विभागाकडे पुरेसा निधी नसल्याने ते देखभाल व दुरुस्तीसाठी मुंबई पालिकेकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रवींद्र वायकर यांनी केली आहे.

रवींद्र वायकर यांनी ही मागणी वरळी दुग्धशाळा आयुक्त आणि एमएमआरडीए आयुक्तांकडे केली आहे.

रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पशु व दुग्ध व्यकसाय विभागाला मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीमुळे आरेतील अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवण्यास आरे प्रशासन असमर्थ ठरले असून याचा नाहक त्रास स्थानिकांना सोसावा लागत आहे.

त्यामुळे येथील 45 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावेत, अशी मागणी वायकर यांनी केली आहे.

याआधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरपालिका आयुक्त, दुग्धशाळा, आरे प्रशासन यांच्या समवेत बैठक घेऊन अंतर्गत रस्ता तसेच मुख्य रस्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी वायकर यांनी केली होती.

त्यानंतर दिनकर देसाई मार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यात येऊन या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सुमारे 47 कोटी रुपये मंजूर केले. सध्या या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

आरेतील 45 कि.मी.च्या अंतर्गत रस्त्याची देखभाल व दुरुस्तीकरिता (डांबरीकरण) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प यांनी सुमारे 48 कोटींचे अंदाजपत्र तयार केले आहे.

तर अंतर्गत रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्डय़ांपासून वाहनचालक व स्थानिक रहिवाशांची कायमची सुटका व दिलासा देण्यासाठी रस्ते सिमेंट-काँक्रीटचे बनविण्यासाठी सुमारे 145 कोटींचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे. परंतु एवढा निधी पशु व दुग्ध विभागाकडे नसल्याने रस्त्यांचे काम रखडले आहे.


हेही वाचा

जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये वाढ, आता ‘इतके’ पैसे आकारणार

Related posts