celebrate Dussehra sitting home Shinde group advice Uddhav Thackeray Mumbai print news ysh 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

शिवाजी पार्क येथील सभेच्या परवानगीचा अद्याप तिढाच

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या अर्जाबाबत अद्यापही पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. परवानगी नाकारण्याची शक्यता गृहित धरून ठाकरे गटाने परवानगीशिवाय मेळावा घेण्याची भाषा सुरू केली आहे. त्यावरून शिंदे गटाने शिवसेनेवर टीका केली असून यावेळी घरात बसूनच दसरा मेळावा घ्या, असा खोचक सल्ला दिला आहे.

हेही वाचा >>> मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांकडून दंडवसुली का?; महापालिकेला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. करोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे बंदिस्त सभागृहात मेळावा घेण्यात आला. करोना नियंत्रणात आल्यानंतर यंदा निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र शिंदे गटानेही अर्ज केल्यामुळे परवानगी कोणाला व कशाच्या आधारे देणार यावरून पालिकेसमोर पेच आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दोन्ही गटांकडून प्रचंड दबाव असल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी याबाबत मौन बाळगले आहे.

हेही वाचा >>> ‘आयएनटी’ एकांकिचे स्पर्धेची आज अंतिम फेरी, कोणते महाविद्यालय मारणार बाजी?

दरम्यान, हे अर्ज पुढील प्रक्रियेसाठी विधि विभागाकडे पाठवण्यात येणार असून विधि विभाग आपला अहवाल पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पाठवणार असल्याचे समजते. अर्जावर निर्णय घेण्याबाबत पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या टोलवाटोलवीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिंदे गटानेही शिवसेनेला घेरण्याची तयारी केली असून समाजमाध्यमावरून शिवसेनेला इशारा दिला आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी याबाबतची ध्वनीचित्रफित प्रसारित केली असून शिवाजी पार्कवर जबरदस्तीने मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेची धुरा असल्याची आठवण त्यांनी या ध्वनिचित्रफितीतून करून दिली आहे. तसेच गेल्या दोन वर्षात दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधण्यात आपण वाकबगार झाला असून यंदाही दसरा मेळाव्याला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करावे असेही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले आहे.Related posts