एकनाथ शिंदेंची भीती खरी ; ग्रामपंचायत निवडणूक निकालावर आशीष शेलार यांची टिप्पणी( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवीत आहे, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली भीती ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर खरी ठरत असल्याची टिप्पणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी सोमवारी केली आहे. दहीहंडी व गणेशोत्सव मंडळे भाजपबरोबर आहेत, हे या उत्सवांमध्ये पक्षाला मिळालेल्या प्रतिसादातून दिसून आले असून शिवसेनेच्या दाव्यांना भाजपने सत्याचा आरसा दाखविला असल्याचे शेलार यांनी सांगितले.

हेही वाचा >>> सांगलीत भाजपकडून जुने हिशेब चुकते

 ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर असून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. या निकालाच्या आकडेवारीवरून तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे डोळे उघडतील, असे अपेक्षित असल्याचे शेलार यांनी

सांगितले. दहीहंडी व गणेशोत्सव म्हणजे शिवसेना, असा दावा शिवसेनेने गेली काही वर्षे करायला सुरुवात केली होती. मात्र भाजपने उत्सवांमध्ये कधीही राजकारण आणले नाही. भाजपकडे आधीही मराठी मते होती व आजही आहेत. भाजपने गणेशोत्सव काळात आयोजित केलेल्या स्पर्धेत १०२६ मंडळांचा सहभाग होता, तर महापालिकेच्या स्पर्धेत केवळ ८० मंडळे सहभागी होती. जनतेचा प्रतिसाद कोणाला होता, हे यावरून दिसून येते, असे शेलार यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी होणार आहे.

Related posts