राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका बछडय़ाचा मृत्यू( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटय़ाच्या तीन बछडय़ांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारासाठी पाठवले होते. यातील एका बछडय़ाचा आठवडय़ाभरापूर्वी मृत्यू झाला होता. सोमवारी आणखी एका बछडय़ाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे तिसऱ्या बछडय़ाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

उपचार घेत असलेल्या तीन पैकी एका मादी बिबटय़ाच्या आठवडय़ापूर्वी मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ सोमवारी आणखी एका बछडय़ाचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमध्ये या तिन्ही बछडय़ांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेंबूर येथील एका खासगी पशुवैशद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना पुण्यातील रेस्क्यु या प्राणीप्रेमी संस्थेकडे पाठविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोन बछडे मृत्यूमुखी पडले असून तिसऱ्या बछडय़ाची प्रकृती नाजूक आहे. दरम्यान राष्ट्रीय उद्यानात पूर्णवेळ आणि निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने प्राण्यांना वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसून त्यामुळे प्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

Related posts