विश्लेषण : हार्बर रेल्वे मार्ग बोरिवलीपर्यंत कसा विस्तारणार? विरारपर्यंत तो शक्य होईल?( प्रगत भारत । pragatbharat.com)

-सुशांत मोरे

सीएसएमटी-वाशी, पनवेल, अंधेरी अशी ओळख असलेल्या हार्बर रेल्वेचा विस्तार काही वर्षांपूर्वी गोरेगावपर्यंत झाला आणि गोरेगावकरांसाठी सीएसएमटीहून प्रवास करणे सुकर झाले. गोरेगाव-पनवेलही थेट लोकलने जोडण्यात आले. याच हार्बर रेल्वे मार्गाचा आता आणखी पुढे म्हणजे बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन आहे. जागेची अडचण असल्यामुळे कांदिवली, मालाडपैकी मालाड उन्नत स्थानक करण्याचाही निर्णय रेल्वेने घेतला आहे. हा विस्तार झाल्यास पश्चिम रेल्वे गाड्यांवरील प्रवाशांचा बराचसा ताण कमी होणार आहे. 

रखडलेला अंधेरी-गोरेगाव हार्बर विस्तार सेवेत? 

गेल्या काही वर्षांत अंधेरीपाठोपाठ जोगेश्वरी, गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत प्रवाशांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे लोकल गाड्यांवरही ताण येऊ लागला.  कुलाबा परिसरात असलेल्या नोकरदारवर्गाला सीएसएमटी-अंधेरीपर्यंत हार्बर रेल्वेने प्रवास करून पुढे गोरेगावपर्यंत जाण्यासाठी अंधेरी स्थानकात उतरून पुन्हा पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगावच्या दिशेने जाणारी लोकल पकडावी लागत होती. गाड्या बदलण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी अनेक जण थेट चर्चगेट स्थानकांतून लोकल पकडून पुढील प्रवास करणे पसंत करत होते. सीएसएमटीपर्यंत येण्यासाठीही बोरिवली, गोरेगाव पट्ट्यात राहणाऱ्यांना अंधेरीला उतरून हार्बर लोकल पकडून सीएसएमटी प्रवास करावा लागतो. त्यामुळे गोरेगावपर्यंत हार्बर लोकल चालवण्याची मागणी प्रवासी करत होते. त्यामुळे अंधेरीपर्यंत असलेल्या सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळाने २००९ साली सुरुवात केली. मात्र अनंत अडचणीनंतर हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर २०१७ उजाडले. जोगेश्वरी स्थानकाच्या दक्षिणेकडे असलेल्या काही बांधकामांमुळे हा विस्तार रखडला होता. त्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि बाजूने निकाल लागताच प्रकल्प सेवेत आला. मात्र त्यामुळे ८८ कोटी रुपये किंमत असलेला हा प्रकल्प थेट २१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

बोरिवलीपर्यंत हार्बर विस्ताराचे स्वप्न?

अंधेरी, त्यानंतर गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावरील गाड्या धावू लागल्यानंतर बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हे काम पश्चिम रेल्वेकडून एमयूटीपी-३ ए अंतर्गत केले जाणार आहे. सध्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगाव दरम्यान लोकल धावते. गोरेगाव ते पनवेल लोकलही सुरू झाल्या. त्यामुळे बोरिवलीपर्यंत हार्बर झाल्यास गोरेगावपर्यंत जाऊन पुन्हा पश्चिम रेल्वेवरील लोकल पकडण्याचा दुहेरी मनस्ताप वाचणार आहे. बोरिवलीहूनही थेट सीएसएमटीपर्यंत प्रवास करणे शक्य होईल. महत्त्वाचे म्हणजे बोरिवली-पनवेल थेट लोकल सुरू झाल्यास त्याचाही प्रवाशांना फायदा होणार आहे. 

बोरिवली विस्तारात जागेची अडचण? 

गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तारात जागेचीही अडचण आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगावच्या पुढे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला मार्ग वाढवण्यास जागा नाही. मालाड स्थानकजवळ तर अधिकच बिकट म्हणावी अशी परिस्थिती आहे. विस्तार करताना खासगी व रेल्वेची काही बांधकामे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे हा मार्ग काही पट्ट्यात उन्नत बांधायचे ठरले आहे. यामध्ये भविष्यात हार्बरवर येणारे मालाड स्थानक उन्नत करून जागा उपलब्ध केली जाणार आहे. मालाड स्थानक उन्नत करताना तिकीट खिडक्यांसह अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. त्यावर सध्या काम सुरू आहे. मार्गिकेचे जिओटेक तसेच ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भूसंपादन आराखडा आणि वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणांकडे सादर करण्यात आला असून या मार्गिकेच्या संरेखनावर पश्चिम रेल्वेकडून काम सुरू आहे. हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार होताच २०३१पर्यंत प्रवासी संख्येत आणखी २ लाखांची भर पडणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

विस्तारास विलंब का? 

गोरेगाव ते बोरिवली मार्ग सात किलोमीटर आहे. प्रकल्पाचा खर्च ७४५ कोटी ३१ लाख रुपये असून या कामासाठी जुलै २०२२पर्यंत निविदा काढण्यात येणार होती. मात्र त्यालाही विलंब झाला असून अद्याप निविदा काढण्यातही आलेली नाही. हार्बर विस्ताराचे काम मार्च २०२५पर्यंत पूर्ण करण्याचे उदिद्ष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र अद्याप सर्वेक्षण आणि काही मंजुरींच्या पातळीवरच प्रकल्प अडकला आहे.

हार्बर विरारपर्यंत कधी?

बोरिवलीपर्यंत हार्बर रेल्वे जाताच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी-३ ए अंतर्गत हार्बर विरारपर्यंत नेण्याचेही स्वप्न बाळगले आहे. हार्बर विस्तारिकारणाचा हा शेवटचा टप्पा असेल. त्यामुळे विरारपर्यंत जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. भविष्यात पनवेल-विरार दरम्यान आणखी दोन उपनगरीय रेल्वे मार्ग होणार आहे. सध्या येथे दोन मार्गिका आहेत. आणखी दोन नवीन मार्गिका टाकून या दरम्यानचा प्रवास सुकर करण्याचे रेल्वेचे स्वप्न आहे. त्यामुळे विरार ते पनवेल प्रवासही सोपा होईल.

Related posts