Lumpy Skin Disease Animal Market Was Held In Dhule City Without Obeying The Order Of The District Collector( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lumpy Skin Disease : दिवसेंदिवस राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्तक झालं आहे. हा आजार फैलावू नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात प्रशासनानं जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जनावरांची ने आण करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, धुळ्यात (Dhule) जिल्ह्याधिकाऱ्यांच्या (Collector) आदेशाला झुगारत जनावरांचा बाजार भरवल्याचा प्रकार घडला आहे. धुळे शहरातील वरखेडी रोडवर हा जनावरांचा बाजार भरवण्यात आला आहे.

एकीकडे राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडं जनावरांचा बाजार भरवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं गुरांच्या बाजारावर बंदी घातली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत अनिश्चित काळासाठी गुरांचा बाजार न भरवण्याचे तसेच जनावारांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच गुरांचा बाजार भरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. असे असताना देखील धुळे शहरातील वरखेडी रोडवर, कृषी उत्पन्न बाजार समिती लगत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या जवळच आज (20 सप्टेंबर) बाजार भरवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारत बेकायदेशीरपणे गुरांचा बाजार भरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कालच जिल्हाधिकाऱ्यांचा याबाबत पुन्हा एकदा सूचना केल्या होत्या. तरीदेखील आज हा गुरांचा बाजार भरवण्यात आला आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता यावर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज्यातील 27 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव 

सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण, जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील जवळपास 27 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे.  आत्तापर्यंत 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळं ठिक झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी दिली आहे. आज (20 सप्टेंबर) 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार असल्याचेही  सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले.

27  जिल्ह्यांमधील 1 हजार 108 गावांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव

राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आयामुळं राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत असल्याचे सिंह म्हणाले. 
राज्यातील जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27  जिल्ह्यांमधील 1 हजार 108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्‍पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरित जनावरांव उपचार सुरु असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या:

Related posts