मुंबई : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अधांतरी ; ‘एमएमआरटीए’च्या बैठकीची तारीखही निश्चित नाही( प्रगत भारत । pragatbharat.com)

सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे भाडेवाढ करावी या मागणीसाठी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला होता. रिक्षा संघटनांनीही भाडेवाढीच्या मागणीचे समर्थन करीत संपाला पाठींबा दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहा दिवसांमध्ये भाडेवाढीवर निर्णय घेतील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सात दिवसांपूर्वी रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत होते. मात्र भाडेवाढीचा निर्णय घेणाऱ्या मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे (एमएमआरटीए) अध्यक्ष आणि अपर मुख्य सचिव (परिवहन) आशिष कुमार सिंह हे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ‘एमएमआरटीए’च्या बैठकीची तारीख अद्यापही निश्चित होऊ शकलेली नाही. परिणामी, भाडेवाढ अधांतरीच आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षा – टॅक्सी चालकांना अतिरिक्त खर्च सोसावा लागत आहे. परिणामी भाडेवाढ करावी अशी मागणी रिक्षा – टॅक्सी युनियनकडून सातत्याने करण्यात येत आहे. सध्या टॅक्सी आणि रिक्षाचे किमान भाडे अनुक्रमे २५ रुपये आणि २१ रुपये आहे. टॅक्सीच्या किमान भाड्यात दहा रुपये, तर रिक्षाच्या भाड्यात दोन ते तीन रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.सातत्याने भाडेवाढीच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अखेर संघटनांनी संपाचा इशारा दिला होता. मात्र यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप पुढे ढकलण्यात आला. मुंबई टॅक्सीमेन्स युनियननेही १५ सप्टेंबरपासून संप पुकारण्याचा इशारा दिला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी १३ सप्टेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुंबई महानगरातील विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांचे ३० प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा : मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक दलात प्रचंड असंतोष

यावेळी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे ए. एल. क्वाड्रोस आणि मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक रावही उपस्थित होते. बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सीसाठी वापरण्यात येणारा सीएनजी गॅस ४० टक्के अनुदानित दराने द्यावा आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत रिक्षा व टॅक्सीच्या भाडेदरात खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेदरात अंतरिम वाढ करावी, अशी मागणीही करण्यात आली. भाडेवाढीबाबत मुख्यमंत्री दहा दिवसांत निर्णय घेतील, असे आश्वासन सामंत यांनी बैठकीत दिले होते.भाडेवाढीचा निर्णय ‘एमएमआरटीए’च्या बैठकीत घेण्यात येतो. त्यामुळे शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर ‘एमएमआरटीए’च्या बैठकीत यावर निर्णय होणे अपेक्षित होते.

हेही वाचा : “‘शिल्लक सेने’च्या ‘टोमणे मेळाव्याला’ परवानगी द्या! खंजीर, मर्द, मावळा…”, मनसेनं उडवली खिल्ली; ‘बारामती’चाही केला उल्लेख

मात्र ‘एमएमआरटीए’चे अध्यक्ष आणि परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिहं १७ सप्टेंबर रोजी परदेश दौऱ्यावर गेले असून ते ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे शासनाने दिलेले दहा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन हवेत विरण्याची चिन्हे आहेत.सध्या आशिष कुमार सिंह यांचा तात्पुरता कार्यभार पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे तात्पुरता कार्यभार असल्याने रिक्षा – टॅक्सी भाडेवाढीसारखा मोठा निर्णय ते कसा घेऊ शकतील, असा प्रश्न आहे. यासंदर्भात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना विचारले असता, लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts