nine percent increase flat rates Pune Most home purchases Hinjewadi Pimpri-Chinchwad areas pune( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : करोनातील निर्बंधमुक्तीनंतर यंदाच्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे जाळे असलेल्या हिंजवडीसह पिंपरी-चिंचवडमधील रावेत, मोशी, ताथवडे आणि वाकड या भागांत सर्वाधिक गृहविक्री झाली आहे. मात्र, एप्रिल ते जून या तिमाहीत पुण्यातील एकूण गृहविक्री आणि पुरवठ्याच्या प्रमाणात घट नोंदिवण्यात आली असून, सदनिकांच्या किमतींमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, दरवाढ होऊनही देशातील प्रमुख शहरांच्या तुलनेत मालमत्तेच्या किमती कमी असल्याचा दावा ‘द गार्डियन्स रिअल इस्टेट ॲडव्हायझरी’ या संस्थेकडून करण्यात आला आहे.

ऑनलाइन रिअल इस्टेट कंपनी प्रॉप टायगरने पुण्यासह मुंबई, हैदराबाद, बंगळूरु आणि चेन्नई आदी प्रमुख शहरांतील मालमत्तांच्या विक्रीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘रिअस इनसाइट रेसिडेन्शिअल: एप्रिल-जून २०२२’ या अहवालानुसार कर्जदरात झालेली वाढ आणि जागतिक भू-राजकीय तणावांमुळे वाढलेल्या साहित्याच्या किमतींमुळे पुण्यातील मालमत्तांच्या दरांमध्ये ९ टक्क्यांनी वाढ नोंदिवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ३० जून २०२२ पर्यंत पुण्यात सदनिकांची किंमत सरासरी प्रतिचौरस फूट ५,४०० ते ५,६०० रुपये होती. पुण्यात मालमत्ताच्या दरात वाढ झाली असली, तरी मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई यासारख्या भारतातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत मात्र सदनिकांच्या किमती कमी आहेत. एप्रिल-जून या तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत पुण्यातील विक्री आणि नव्याने पुरवठा या दोन्हीत अनुक्रमे १६ टक्के आणि १४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेचे उद्या आंदोलन

‘द गार्डियन्स रिअल इस्टेट ॲडव्हायझरी’चे संचालक राम नाईक यांनी याबाबत सांगितले,की दरवाढ असूनही इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात मालमत्तेच्या किमती कमी आहेत. व्याजदरही करोनापूर्वीच्या पातळीपेक्षा कमी आहेत. त्यामुळे वाढत्या व्याजदरासह मालमत्तांच्या किमती वाढल्याचा परिणाम पुण्यातील बांधकाम क्षेत्रावर होणार नाही. करोनाच्या निर्बंधांनंतर कार्यालये पुन्हा सुरू होण्यासह आगामी सणासुदीच्या हंगामात पुण्यात घरखरेदीला चालना मिळेल.

हेही वाचा : उद्धव ठाकरे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रक्षोभक भाषणं करत आहेत ; गिरीश महाजनांची टिका

‘टू बीएचके’ सदनिकांना प्राधान्य

रावेत, हिंजवडी, मोशी, ताथवडे आणि वाकड या विभागांमध्ये २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत गृहखरेदीसाठी सर्वाधिक मागणी दिसून आली. हिंजवडी आणि मोशीमधील बहुतांश विक्री २५ ते ४५ लाख, तर रावेत, ताथवडे आणि वाकडच्या बाबतीत ४५ ते ७५ लाखांच्या आसपास विक्री होती. विशेष म्हणजे पुण्यातील एकूण गृहविक्रीमध्ये ‘टू बीएचके’ सदनिकांना प्राधान्य दिले जात आहे. एकूण विक्रीमध्ये ५३ टक्के वाटा ‘टू बीएचके’ सदनिकांचा आहे.Related posts