प्रारंभीच्या दीर्घिकांची आण्विक हायड्रोजनपासून निर्मिती ; राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील शास्त्रज्ञांचे संशोधन( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  दीर्घिकांच्या निर्मितीबाबत आतापर्यंत असलेल्या समजाला छेद देणारे संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी केले. सुमारे नऊ अब्ज वर्षांपूर्वी ताऱ्यांची निर्मिती करणाऱ्या दीर्घिकांची निर्मिती आण्विक हायड्रोजनपासून झाली होती. या दीर्घिकांची रचना तुलनेने तरुण दीर्घिकांपेक्षा भिन्न असल्याचे संशोधनातून दिसून आले. एनसीआरएतील शास्त्रज्ञ आदित्य चौधरी, प्रा. निस्सीम काणेकर, प्रा. जयराम चेंगलूर यांचा या संशोधनात सहभाग होता.

संशोधनाचा शोधनिबंध अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रसिद्ध झाला. दीर्घिकांमधील हायड्रोजन वायू आणि ताऱ्यांचे प्रमाण मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी खोडद येथील जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) साहाय्याने ११०० दीर्घिकांची निरीक्षणे करून नोंदी घेतल्या. या संशोधनासाठी अणुऊर्जा विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने निधी दिला होता.

दीर्घिकांबाबत सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम देऊन त्यांची निर्मिती स्पष्ट करणारे निष्कर्ष संशोधनातून हाती आले. प्रारंभीच्या विश्वातील दीर्घिका प्रामुख्याने आण्विक हायड्रोजनद्वारे तयार झाल्या. गेल्या नऊ अब्ज वर्षांमध्ये दीर्घिकांमधील वायूचा मोठा साठा ताऱ्यांमध्ये रूपांतरित होऊन आपल्या आकाशगंगेसारख्या दीर्घिका निर्माण झाल्या. त्यांच्या वस्तुमानात ताऱ्यांचे वर्चस्व आहे, असे प्रा. चेंगलूर यांनी सांगितले.

नव्या निष्कर्षांमुळे दीर्घिकांमधील अणुवायूच्या वस्तुमानाबाबत गहाळ झालेल्या गंभीर माहितीचे उत्तर मिळाले. या संशोधनासाठी २१ सेंटीमीटर तरंगलांबीचा वापर करून दीर्घिकांचे सरासरी अणुवायू वस्तुमान थेट मोजता आले. सरासरी अणुवायू वस्तुमानाची त्यांच्या सरासरी आण्विक वायू वस्तुमान आणि सरासरी तारकीय वस्तुमानाशी तुलना केली असता नऊ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांची रचना आजच्या आकाशगंगांपेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले, असे प्रा. काणेकर यांनी नमूद केले.

अशी होते ताऱ्यांची निर्मिती..

दीर्घिकांमधील सामान्य (बॅरिओनिक) पदार्थ बहुतेक अणू किंवा आण्विक हायड्रोजन आणि ताऱ्यांच्या स्वरूपात असतात. दीर्घिकांच्या आयुष्यात अणू हायड्रोजन थंड होऊन आण्विक हायड्रोजनमध्ये रूपांतरित होतो आणि त्यापासूनच तारे बनतात. दीर्घिकेतील अणू, आण्विक आणि तारकीय सामग्रीचे सापेक्ष प्रमाण हे त्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचे सूचक आहेत.

सामान्य आकाशगंगेतील एकूण बॅरिओनिक पदार्थापैकी जवळजवळ दोन तृतीयांश पदार्थ ताऱ्यांमध्ये, एक तृतीयांश अणुवायूमध्ये  आणि फक्त सहा टक्के आण्विक स्वरूपात आहे. अशाप्रकारे जवळपासच्या दीर्घिकांतील बहुतेक सामान्य पदार्थ ताऱ्यांमध्ये असतात. मात्र विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील दीर्घिकांमधील परिस्थिती रहस्यमयी आहे. या दीर्घिकांच्या आण्विक हायड्रोजनचे निरीक्षण केले असता आण्विक हायड्रोजन एकूण वस्तुमानातील ताऱ्यांशी तुलना करता येण्याजोगा आहे. त्यामुळे या दीर्घिका तुलनेने तरुण दीर्घिकांपेक्षा वेगळय़ा असल्याचे संकेत मिळतात.

आदित्य चौधरी, शास्त्रज्ञ, एनसीआरए

Related posts