dussehra rally bombay hc to hear t amended petition of uddhav camp challenging bmc decision zws 70( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली.

आधीच्या याचिकेत मुंबई महानगरपालिकेला परवानगीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीची परवानगीही मागण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने ठाकरे गटाला सुधारित याचिका करण्याची परवानगी दिली.

ठाकरे गटाचा अर्ज आम्ही फेटाळल्याने त्यांच्या याचिकेला काही अर्थ नाही, असा दावा करून महानगरपालिकेने ठाकरे गटाच्या सुधारित याचिका करण्याच्या मागणीस विरोध केला होता. मात्र याचिकेत न्यायालयाने शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे, असे ठाकरे गटाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ठाकरे गटाला सुधारित याचिका करण्यास परवानगी देऊन न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमळ खाता यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने ठाकरे गटाच्या याचिकेला विरोध करणारी मध्यस्थी याचिका केली आहे. आपली शिवसेना खरी असल्याचा दावा करून उद्धव ठाकरे यांचा गट न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून ठाकरे गटाची याचिका फेटाळण्याची मागणी सरवणकर यांनी केली आहे. खरी शिवसेना कोणती याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याची बाब उद्धव ठाकरे गटाने लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. अशा स्थितीत या न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्यास आपला गट म्हणजे खरी शिवसेना असल्याचे वाटेल, असा दावा सरवणकर यांनी याचिकेत केला आहे. तसेच हा वाद संपुष्टात येईपर्यंत शिवसेनेच्या याचिकेला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शिंदे गटासोबत बहुतांशी आमदार असून शिंदे हे आमचे मुख्यनेता आहेत. त्यामुळे आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असून शिवाजी पार्कवर आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज महानगरपालिकेकडे केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

शिवसेना रस्त्यावर उतरणार?

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क न मिळाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शिवाजी पार्क मिळावे, या मागणीसाठी शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली असून त्यावर शुक्रवारी निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील रणनीती ठरविली जाईल, असे शिवसेना प्रवक्ते अ‍ॅड्. अनिल परब यांनी गुरुवारी सांगितले.

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्याला मेळाव्यासाठी मिळावे, असा अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने महापालिकेकडे केला होता. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी दावा केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आणि महापालिकेने अर्ज फेटाळला. आता शिवसेनेने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. पण शिवाजी पार्क शिवसेनेच्या मेळाव्यासाठी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.

न्यायालयाने अनेकदा शिवसेनेला मैदान उपलब्ध करून देण्याचे आदेश आतापर्यंत दिले आहेत. आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अन्य मैदानासाठी अर्ज केला नसून न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरविली जाईल, असे परब यांनी स्पष्ट केले.Related posts