विश्लेषण : महाराष्ट्रात यंदा ढगफुटी झाली का? | What are cloudbursts and why do they cause flash floods did it happen this year in maharashtra( प्रगत भारत । pragatbharat.com)

-पावलस मुगुटमल

सध्या मोसमी पावसाला परतीचे वेध लागले आहेत. लवकरच पाऊस राजस्थानमधून मागे फिरेल आणि आठ ते सहा दिवसांच्या परतीच्या प्रवासानंतर तो देशाचा निरोप घेईल. यंदा मोसमी पावसाच्या कालावधीत ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत पावसाने रौद्ररूप दाखविले. त्यापूर्वी पुणे, नगरसह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी कमी वेळेत मोठ्या पावसाची नोंद झाली. यंदाच्या या पावसाला ढगफुटीसदृश पाऊस म्हणून संबोधले गेले. अवघ्या काही वेळातच बरसलेल्या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर येण्याची स्थिती राज्यात यंदा काही भागांत झाली. कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती ढगफुटीसदृशच समजली जाते. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक भागांत अशा स्वरूपाचा पाऊस आणि प्रत्यक्षात ढगफुटी झालेली आहे.

ढगफुटी म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर हजार लिटरच्या एका टाकीतून आठ ते दहा तास शॉवरप्रमाणे पाणी जमिनीवर पडणे, म्हणजे पाऊस आणि टाकी फुटून काही वेळातच हजार लिटर पाणी खाली कोसळणे म्हणजे ढगफुटी. ठाणे, मुंबईसह कोकणात गेल्या आठवड्यात मोठा पाऊस झाला. राज्यातही अनेक भागांत यंदा धुवांधार पावसाची नोंद झाली. ढगफुटीप्रमाणे पाऊस किंवा ढगफुटी म्हणजे काय, याचे काही निकष भारतीय हवामान विभागाकडून ठरविण्यात आले आहेत. एका तासाच्या कालावधीत १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने त्याला हवामान विभागाकडून ढगफुटी संबोधले जाते. आकाशात मोठ्या संख्येने आणि अधिक उंची असलेल्या ‘क्युम्युलोनिन्बस’ या ढगांमुळे ढगफुटीचा प्रकार होतो. भारतामध्ये पावसाळ्यात विविध भागांत अशा प्रकारचे ढग निर्माण होतात. हिमालय, पश्चिम घाट आणि ईशान्येकडील राज्यात प्रामुख्याने हे ढग निर्माण होत असतात.

ढगफुटीला सुरूवात कशी होते?

ढगफुटीमध्ये गडगडाटासह वादळी पावसाला घेऊन येणारे ढग असतात. ‘क्युम्युलोनिन्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे आणि निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात, झपाट्याने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग. मोठ्या प्रमाणावर आणि अधिक उंचीने ढग एकत्र होणे ही ढगफुटीच्या प्रक्रियेची सुरुवात असते. गरम हवा आणि आर्द्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. ते प्रचंड वेगााने खाली येऊन पुढे जोरदार पाऊस पडतो. 

ढगफुटी नेमकी कशी होते?

मोठ्या संख्येने अधिक उंचीपर्यंत जमा झालेल्या ढगांमध्ये कधीकधी वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला ‘अपड्राफ्ट्स’ असे म्हणतात. पाण्याच्या थेंबांना घेऊन तो वरवर निघतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले मोठे होतात. कधीकधी त्यांचे आकारमान ३.५ मिमीहून मोठे होते. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि वेगाने खाली येतो. त्यामुळे पाण्याचे मोठमोठे थेंब सुसाट वेगाने जमिनीकडे येतात. हवेचा हा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने येत असतो. त्याला ‘डाऊनड्राफ्ट्स’ म्हणतात. पाण्याचे थेंब कधीकधी ८० ते ९० किलोमीटर वेगाने खाली येतात. अशी स्थिती ढगफुटीस कारणीभूत ठरते.

ढगफुटीचे परिणाम कोणते?

जास्त विस्तार नसलेला पण अधिक उंची असलेला ढग ढगफुटीसाठी कारणीभूत ठरतो. मोठे थेंब आणि त्यांच्या कोसळण्याला असलेला प्रचंड वेग यामुळे जमिनीसह त्यावर असलेले काहीही अक्षरश: झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते आणि पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि पूरस्थिती निर्माण होते. त्यातून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्यासह माणसे आणि प्राण्यांचा जीवही जातो. मोठ्या प्रमाणावर पाणी घेऊन वेगाने खाली येणारा स्तंभ विमानांसाठी अत्यंत धोकादायक ठरतो. त्याने विमान कोसळू शकते.

सर्वांत मोठी ढगफुटी कोणती?

हिमालयात सातत्याने ढगफुटी होते. त्याचप्रमाणे ईशान्येकडील राज्यांतही अनेकदा ढगफुटीप्रमाणे पाऊस होत असतो. मात्र डोंगराळ भागात झालेली ढगफुटी फारशी चर्चेत येत नाही. मनुष्यवस्तीत ढगफुटी झाल्यास मात्र होणाऱ्या परिणामांमुळे मोठी चर्चा होते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेला पाऊस ही ढगफुटीच होती. मुंबईच्या उपनगरी भागात या दिवशी आठ तासांत ९५० मिलिमीटर पाऊस पडला होता. किनारी भागामध्ये ढगफुटी होण्याचे प्रकार कमी वेळा घडतात. लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१० रोजी झालेली ढगफुटी जगातली आजवरची सर्वांत मोठी ढगफुटी समजली जाते. एका मिनिटामध्ये सुमारे ४८ मिलिमीटर वेगाने हा पाऊस झाला होता.Related posts