मुंबई (pragatbharat.com) : परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता परदेशी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या, परंतु आर्थिक अडचणींमुळे वेळेत प्रवेश घेऊ न शकलेल्या ५ विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.या योजनेंतर्गत एकूण २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने शिष्यवृत्ती मंजूर झाल्याशिवाय त्यांना परदेशी शिक्षणासाठी जाता आले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या विनंतीचा विचार करून शासनाने त्यांना जुलै आणि सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये आर्यन अग्रवाल, हृदी भंडारी, सत्यम जोशी, किरण तत्तू आणि सिध्देश दिवे या विद्यार्थ्यांचा समावेश असून, ते मँचेस्टर, ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटी आणि ब्रिस्टल यांसारख्या नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार आहेत.या निर्णयामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना आता त्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले उच्च शिक्षण पूर्ण करता येणार आहे. सदर विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा खर्च आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून उपलब्ध असलेल्या तरतुदींमधून भागवला जाणार आहे. गुणवंत मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सरकारने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.सूचना (Disclaimer): सदर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकृत शासन निर्णयावर आधारित आहे. शिष्यवृत्तीच्या अटी व शर्तींबाबत अधिक माहितीसाठी शासनाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

