आफ्रिकी राष्ट्र मालीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर आत्मघातकी ट्रक बॉम्बस्फोट, मंत्र्यांसह कुटुंबीय ठार

बमाको (pragatbharat.com) : पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात सुरू असलेल्या यादवी संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. मालीचे संरक्षण मंत्री सादियो कॅमारा यांच्या राजधानी जवळील काती (Kati) येथील निवासस्थानावर एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेला ट्रक आदळून भीषण आत्मघातकी हल्ला केला. या भीषण स्फोटात संरक्षण मंत्री कॅमारा, त्यांची पत्नी आणि दोन नातवंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समन्वित हल्ल्यांनी माली हादरले:

हा हल्ला केवळ वैयक्तिक नव्हता, तर दहशतवादी संघटनांनी संपूर्ण मालीमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी ‘को-ऑर्डिनेटेड’ हल्ले चढवले आहेत. अल-कायदाशी संबंधित ‘जेएनआयएम’ (JNIM) आणि तुआरेग बंडखोरांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. बमाको विमानतळ, काती लष्करी तळ आणि उत्तरेकडील अनेक शहरांमध्ये शनिवारी सकाळी हे हल्ले झाले. या स्फोटामुळे संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानासह शेजारील एक मशीद आणि इतर इमारतींचेही मोठे नुकसान झाले असून अनेक सामान्य नागरिकही मारले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

लष्करी राजवटीसमोर मोठे आव्हान:

मालीमध्ये सध्या लष्करी राजवट (Junta) असून या हल्ल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दाव्यांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. या घटनेनंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजधानीत कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून संयुक्त राष्ट्रांनी (UN) या हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण साहेल प्रदेशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय समुदायाने मालीला तातडीने मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *