
नाशिक (pragatbharat.com) : नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाने ४० अंशांची पार केल्याने जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. एप्रिल महिना संपण्यापूर्वीच जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले असून, सध्या ४४ टँकर्सद्वारे ४० गावे आणि ८७ पाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. कोकण विभागाखालोखाल नाशिक जिल्ह्यात टंचाईची तीव्रता सर्वाधिक जाणवत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर: आगामी मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता असल्याने, टँकर्सच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. अनेक वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाणी अत्यंत जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत. धरणांमधील पाणीसाठाही वेगाने खालावत असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

