
मुंबई (pragatbharat.com) : विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीमध्ये मोठे राजकीय नाट्य रंगले असून उमेदवारीवरून मित्रपक्षांमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत असल्याची चर्चा होती, मात्र ठाकरेंनी स्वतः विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय कायम ठेवल्याने आघाडीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्वतःऐवजी शिवसेनेतून (ठाकरे गट) अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचे वातावरण असल्याचे समजते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत सूचक विधान केले आहे. “आमची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली होती, मात्र चर्चेत काही अडथळे आले. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही,” असे सांगत त्यांनी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सपकाळ यांनी “आगे, आगे देखो होता है क्या” असे विधान केल्याने महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरेंच्या निर्णयानंतर निर्माण झालेला हा समन्वयाचा अभाव आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला महागात पडणार की काँग्रेस नवी रणनीती आखणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे विधान परिषदेची समीकरणे आता कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत.

