
अहमदनगर/पुणे (pragatbharat.com) : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आता सर्वांनाच ४ मे रोजी लागणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
विशेषतः राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा वरचष्मा असल्याचे चित्र समोर येत आहे. ‘रुद्र रिसर्च’च्या एक्झिट पोलनुसार, कर्डिले यांना सुमारे १ लाख ४२ हजार ५०० मते मिळण्याची शक्यता असून, एकूण मतदानापैकी तब्बल ७६ टक्के मतांचा वाटा त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. जर हे आकडे निकालात बदलले, तर कर्डिले यांचा विजय ऐतिहासिक मानला जाईल.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून रिंगणात असलेले गोविंद मोकाटे यांना सुमारे २५ हजार ५०० मतांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता असून, त्यांचा मतांचा टक्का १४ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांनीही या निवडणुकीत आपले आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जरी हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असला, तरी या आकडेवारीमुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे, तर महाविकास आघाडीच्या निकालाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

