
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील कुर्ला परिसरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या टोळीयुद्धाने (Gangwar) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कुर्ला पश्चिम येथील गजबजलेल्या ‘हलाओ पूल’ परिसरात बुधवारी, २९ एप्रिल रोजी संध्याकाळी बाबा यलप्पा पवार याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी नाकाबंदी कडक केली आहे.
घटनेच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ होती. याच दरम्यान हल्लेखोरांनी बाबा पवारला गाठले आणि त्याच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या आवाजामुळे नागरिक सैरावैरा धावू लागले. धक्कादायक बाब म्हणजे, गोळीबार केल्यानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत; त्यांनी धारदार शस्त्रांनी बाबा पवारवर सपासप वार केले आणि त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढला.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बाबा पवारला तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार हा प्रकार गँगवारमधून घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कुर्ला पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या या कृत्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

