टिटवाळ्यात अवघ्या ७०० रुपयांसाठी मित्राचाच काढला काटा; ३०० सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या नजरेने असा सापडला खुनी

कल्याण (pragatbharat.com) : मानवी नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरातून समोर आली आहे. अवघ्या ७०० रुपयांच्या किरकोळ वादातून एका मित्रानेच दुसऱ्या मित्राची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपी योगेश कदम याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी खडवली नदीच्या परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी परिसरातील तब्बल ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या दरम्यान पोलिसांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या आणि त्यातूनच मृताची ओळख पटली.

पोलीस तपासात समोर आले की, आरोपी योगेश कदम आणि त्याचा मित्र यांच्यात खडवली नदीकाठी पार्टी सुरू असताना पैशांवरून वाद झाला. हा वाद अवघ्या ७०० रुपयांच्या देण्याघेण्यावरून विकोपाला गेला आणि रागाच्या भरात योगेशने आपल्याच मित्राचा जीव घेतला. कोणताही पुरावा मागे न ठेवता पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. एका किरकोळ रकमेसाठी झालेल्या या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *