भारतीय स्टार्टअपची अंतराळात गरुडझेप! ‘गॅलेक्सआय’च्या ‘मिशन दृष्टी’चे पंतप्रधान मोदींकडून कौतुक; जगातील पहिला ‘OptoSAR’ उपग्रह यशस्वी

नवी दिल्ली (pragatbharat.com) : भारताच्या अंतराळ संशोधन प्रवासात आज एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. स्वदेशी स्टार्टअप ‘गॅलेक्सआय’ (GalaxEye) द्वारे राबवण्यात आलेल्या ‘मिशन दृष्टी’ अंतर्गत जगातील पहिल्या ‘OptoSAR’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाचे वर्णन भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी म्हणून केले असून, गॅलेक्सआयच्या संस्थापक आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी समाज माध्यमांवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. भारतातील हा सर्वात मोठा खाजगीरीत्या तयार करण्यात आलेला उपग्रह आहे. आपल्या तरुणांमधील नाविन्यपूर्ण शोध घेण्याची जिद्द आणि राष्ट्र उभारणीची आवड यामुळेच हे शक्य झाले आहे.” या यशामुळे अंतराळ क्षेत्रात भारताच्या खाजगी कंपन्यांचे वर्चस्व निर्माण होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘OptoSAR’ उपग्रहाचे वैशिष्ट्य: हा जगातील असा पहिलाच उपग्रह आहे, ज्यामध्ये Optical (ऑप्टिकल) आणि SAR (सिंथेटिक अपर्चर रडार) या दोन्ही तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामुळे ढगाळ हवामान, धुके किंवा रात्रीच्या अंधारातही पृथ्वीवरील उच्च दर्जाची छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे. हवामान अंदाज, कृषी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी या उपग्रहाची मोठी मदत होणार आहे. ‘आयआयटी मद्रास’मधील तरुणांनी सुरू केलेल्या या स्टार्टअपच्या यशाने भारताच्या ‘स्पेस-टेक’ क्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *