
पुणे/अहमदनगर (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देत मोठी आघाडी घेतली आहे. सातव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार ६३,१८६ हून अधिक मतांनी आघाडीवर असून, त्यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपने वर्चस्व राखले आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी पाचव्या फेरीअखेर २५,८८६ मतांची मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत एकूण ३०,००० मते मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार गोविंद मोकाटे केवळ ४,४०० मतांवर रेंगाळत आहेत. राहुरीत कर्डिले यांची ही मुसंडी विरोधकांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
बारामतीची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती, तर राहुरीची जागा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. दोन्ही ठिकाणी वारसा टिकवण्याची ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची होती. बारामतीत सुनेत्रा पवार यांची गाडी सुसाट असून, त्यांनी पहिल्या फेरीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली आहे. तर राहुरीत अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेल्याचे प्राथमिक निकालांवरून स्पष्ट होत आहे.

