भाकरीसाठी नाही तर स्वाभिमानासाठी बाबासाहेबांनी सामाजिक संघर्ष केला – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

भोकर (प्रतिनिधी) (pragatbharat.com) :  केवळ भाकरीसाठी नाही तर महिला व बहुजन समाजाच्या हक्क अधिकार व स्वाभिमानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, परखड व्याख्याते व पत्रकार इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
भोकर तालुक्यातील किणी (जिल्हा नांदेड) येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. ज्येष्ठ नागरिक पवळे सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, आजचे सरकार बहुजन समाजाला लाचार व गुलाम बनविण्याचा प्रयत्न कfरीत आहे. देशातील ८० हजार कोटी लोकांना आम्ही राशन देत आहोत असे प्रधानमंत्री म्हणतात, यात त्यांना मोठेपणा वाटत असला तरी ही शरमेची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शासनकर्ती जमात बनण्याचा संदेश दिला होता पण आम्ही मात्र फक्त राषणकर्ते बनत आहोत. कोण काय फुकट देतो याची आपण वाटच पाहत असतोत. या लाचारीमुळेच आपला अमूल्य असा मताचा अधिकार आम्ही विकून टाकत आहोत, त्यामुळे राज्यकर्ते बनण्याचा विचार मागे पडत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या “प्रॉब्लेम ऑफ रुपी” या ग्रंथामुळे आरबीआयची निर्मिती झाली. आम्हाला तर अर्थकारणच कळत नाही, त्यामुळे आमच्या बँका निघू शकल्या नाहीत. देशात सत्ता संपत्तीचे विकेंद्रीकरण होऊ शकले नाही. जमीनदारी, कारखानदारी, नोकऱ्या, संपत्ती यावर विशिष्ट लोकांचा ताबा होत चालला आहे. दारिद्र्य व गरिबी यातच आम्ही जीवन जगत आहोत. यात बदल हवा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आम्ही तंतोतंत पालन केले पाहिजे असेही शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले.
याप्रसंगी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे भोकर तालुकाध्यक्ष तथा पत्रकार रमेश गंगासागरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुटवाड, सरपंच प्रतिनिधी भूमारेड्डी गड्डमवाड इत्यादींनी आपले विचार मांडले. पोलीस पाटील होनाजी बोडके, विजयालक्ष्मी करेमगार, सहशिक्षक गंगाप्रसाद समुद्रवाड, रतन गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जयंती समितीचे अध्यक्ष नितीन मोरे, उपाध्यक्ष नागोराव रसाळे व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *