
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी मोठी खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून समजते.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जात आहे. महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाला हिरवा कंदिल दिल्याचे वृत्त आहे.
या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः बारामतीमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्यास, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला नवी ताकद मिळण्याची आशा आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल आणि विरोधकांकडून कोणताही उमेदवार न दिल्यास ही निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

