
नवी दिल्ली/मुंबई (pragatbharat.com) : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज देशाच्या विविध भागात हवामानातील मोठ्या बदलांचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण भारतात पावसाने हजेरी लावली असताना, पश्चिम भारतात मात्र उष्णतेचा तडाखा कायम आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर आज दिवसभर हवामान अत्यंत उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता असून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि माहे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झाली असली तरी, उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णतेची लाट (Heat Wave) कायम आहे. गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये आज तीव्र उष्णतेची लाट जाणवेल, तसेच राजस्थानमध्ये पुढील ७ दिवस रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
दुसरीकडे, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. आगामी २-३ दिवसांत ईशान्य भारत, अंदमान-निकोबार बेटे, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल. महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात वाढत्या आर्द्रतेमुळे (Humidity) नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

