
पुणे (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्य लवकरच महसूल क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलणार आहे. येत्या जुलै महिन्यात राज्यात ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू केला जाणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता आता ‘निश्चित प्रॉपर्टी’ म्हणून ओळखली जाईल आणि ती जगातील कोणत्याही देशात कायदेशीररित्या ‘कॅश’ करता येईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार भीमराव तापकीर, डॉ. विश्वजीत कदम, डॉ. शिवाजीराव कदम आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई उपस्थित होते.
प्रशासकीय सुधारणा आणि तंत्रज्ञानावर भर: मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणांतर्गत दीड हजार कोटींचे करार केले असून दीड लाख विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत ३० लाख विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. यापुढे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची गरज भासणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली.
या प्रसंगी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन केले, तर आमदार विश्वजीत कदम यांनी भारती विद्यापीठाच्या ६२ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना ‘डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.


