Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना बसणार फटका

नवी मुंबई (pragatbharat.com) : नवी मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शहराच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती आणि मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) बुधवारी, १३ मे रोजी सकाळी १०:०० ते गुरुवारी, १४ मे रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत असा २४ तासांचा ‘वॉटर शटडाऊन’ जाहीर केला आहे.

या कालावधीत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि सीबीडी बेलापूर सेक्टर-२८ येथील पंपिंग हाऊसमध्ये मोठ्या व्यासाचे व्हॉल्व्ह बसवणे, विद्युत यंत्रणेची दुरुस्ती आणि मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या नोड्समध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या खारघर आणि कामोठे या भागांनाही याचा मोठा फटका बसणार आहे.

गुरुवारी सकाळी १० वाजेनंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, मात्र प्रणाली कार्यान्वित होण्यास वेळ लागत असल्याने गुरुवारी संध्याकाळी पाणी कमी दाबाने मिळण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याचा कडाका आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, महानगरपालिकेने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि पाण्याचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *