
नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशातील वित्तीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध बँकर उदय कोटक यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. “आपण आगामी काळातील वाईट परिस्थितीसाठी तयार राहिले पाहिजे,” असे म्हणत त्यांनी बदलत्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाला सावध केले आहे. दिल्लीतील CII च्या वार्षिक परिषदेत बोलताना त्यांनी ऊर्जा संकट आणि महागाईवर चिंता व्यक्त केली.
अमेरिका-इराण युद्धाचा मोठा फटका: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनामागे अमेरिका-इराण युद्धाची पार्श्वभूमी आहे. उदय कोटक यांच्या मते, गेल्या दोन महिन्यांत जुना साठा आणि तेल कंपन्यांच्या सोशिकतेमुळे भारतीय ग्राहकांना इंधन दरवाढीची झळ बसली नाही. मात्र, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मधील जलवाहतूक ठप्प झाल्यामुळे आणि जगातील २० टक्के तेल पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आता मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
महागाई आणि मध्यमवर्गीयांचे बजेट: भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेल आयात करतो. जर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेल्या, तर रुपया आणखी ढासळेल आणि चालू खात्यातील तूट वाढेल. “कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी वाढत्या इंधन किमती आणि महागाईचा सामना करणे हे सर्वात मोठे आव्हान असेल,” असे कोटक यांनी स्पष्ट केले. भारतीय कंपन्यांनी आता केवळ नफ्याचा विचार न करता ‘दीर्घकालीन राष्ट्रीय मजबुती’साठी विचार करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकारला ‘कॉर्पोरेट’ सल्ला: उदय कोटक यांनी सरकारला आपली अर्थव्यवस्था एखाद्या ‘कॉर्पोरेट बॅलेन्स शीट’ सारखी मॅनेज करण्याचा सल्ला दिला आहे. अनावश्यक खर्च कमी करून आर्थिक स्थिरता राखण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचे समर्थन करत, देशाला ऊर्जा शॉकपासून वाचवण्यासाठी आतापासूनच कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले. या इशाऱ्यामुळे आता उद्योग क्षेत्रात आणि सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

