
मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या वैवाहिक आयुष्यात खटके उडत असल्याच्या आणि त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मनोरंजन विश्वात रंगत असतानाच, आता आणखी एका लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याच्या विभक्त होण्याच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ही जोडी म्हणजे प्रेक्षकांची लाडकी हास्यसम्राज्ञी भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया. इंटरनेटवर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना प्रचंड उधाण आले होते, ज्यावर आता खुद्द भारतीने तिच्या अधिकृत युट्यूब व्लॉगद्वारे (YouTube Vlog) मौन सोडले असून या अफवांचे सत्य समोर आणले आहे.
“मी आता हर्षसोबत राहू शकत नाही..” भारतीचे वक्तव्य भारतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये सुरुवातीला अत्यंत गंभीर होत म्हटले की, “मी आता हर्षसोबत राहू शकत नाही. कारण आमच्यात आता फूट पडू लागली आहे. माझी सतत चिडचिड होतेय आणि बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या हर्षलाही सहन होत नाही आहेत. आमच्यात सतत खटके उडत असून आम्ही विभक्त होत आहोत.” भारतीच्या या सुरुवातीच्या विधानामुळे तिचे चाहते आणि नेटकरी कमालीचे थक्क झाले होते.
घटस्फोटाच्या अफवांवर भारतीने सोडले तोंडसुख मात्र, हे विधान केल्यानंतर भारतीने लगेचच रागाच्या सुरात या चर्चांमागचे सत्य सांगितले आणि अफवा पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले. भारती पुढे म्हणाली, “सध्या सोशल मीडियावर आमच्याबद्दल अनेक फालतू आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या सर्व बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत. मी आणि हर्ष कधीच वेगळे होऊ शकत नाही, अगदी मृत्यूनंतरही नाही! आम्ही नेहमी एकत्र होतो आणि आयुष्यभर एकत्रच राहू. त्यामुळे आमच्या घटस्फोटाच्या खोट्या चर्चा आता थांबवा.”
९ वर्षांचा सुखी संसार आणि दोन मुले भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये गोव्यात अत्यंत थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला आता ९ वर्षे पूर्ण होत आली आहेत. या जोडप्याला दोन गोंडस मुले आहेत. २०२२ मध्ये भारतीने तिचा मोठा मुलगा लक्ष्य (गोला) याला जन्म दिला होता, तर नुकतेच डिसेंबर २०२५ मध्ये भारतीने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव यशवीर असे ठेवले आहे. युट्यूबवर स्वतः व्लॉग पोस्ट करत भारतीने त्यांच्या घटस्फोटाच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला असून त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखी असल्याचे स्पष्ट केले आहे.

