
मुंबई (pragatbharat.com) : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांद्याला प्रति किलो २४ रुपये दर देण्याची आणि ‘नाफेड’ने किमान ८ ते १० लाख टन कांदा खरेदी करून तो भारताबाहेर निर्यात करावा, अशी आग्रही मागणी केली.
रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या कांद्याला साडेबारा रुपये दर मिळत असून तो १६ रुपये केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच, यंदा पाऊस १० ते १२ टक्के कमी होण्याचा अंदाज असल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी आर्थिक मदत न मिळाल्यास आगामी खरीप हंगामात मोठ्या अडचणी निर्माण होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
या भेटीत रोहित पवार यांनी केवळ शेतीच नव्हे, तर इतर सामाजिक मुद्द्यांवरही चर्चा केली. ‘नीट’ (NEET) परीक्षेतील घोटाळ्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी, आगामी अधिवेशनात महिला सुरक्षेसाठीचा ‘शक्ती कायदा’ मंजूर करावा आणि बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पांवरील खर्च कमी करून तो पैसा लोककल्याणासाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली. पक्षाच्या आगामी वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

