
मुंबई (pragatbharat.com) : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका पेपरफुटीप्रकरणात आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर थेट आणि अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देशात किंवा राज्यात कुठेही वाईट घडायचे असेल, की तिथे ‘शाह’ कनेक्शन आलंच, असा थेट टोला लगावत त्यांनी या संपूर्ण घोटाळ्यामागे भाजपच असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “या मोठ्या पेपरफुटीचे धागेदोरे आणि कनेक्शन थेट महाराष्ट्रात असल्याचे समोर येत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री यावर अवाक्षरही बोलायला तयार नाहीत, याचे आश्चर्य वाटते. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमागे भाजपचे लोक सक्रिय आहेत.” या गंभीर राष्ट्रीय मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
इंधन दरवाढ आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधानांवर तोफ यावेळी खासदार राऊत यांनी देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तीव्र शब्दांत निशाणा साधला. “सामान्य जनतेवर एकापाठोपाठ एक अशा चार वेळा इंधन दरवाढीचा बोजा टाकून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात आहेत. जनतेने प्रवास करायचा नाही, घराबाहेर पडायचे नाही, असा सल्ला दिला जात आहे. राज्यातील आणि देशातील सरकार जनतेची फसवणूक करत असून ते जमिनीवर नसून हवेत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर व चिंताजनक झाली असून भविष्यात मोठे आर्थिक संकट येणार आहे, हा राहुल गांधी यांचा इशारा कसा योग्य आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘नीट’ पेपरफुटीचा हा वाद आता थेट राजकीय पटलावर आल्यामुळे आगामी काळात यावरून संसदेत आणि राज्यात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.


