
मुंबई (pragatbharat.com) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर अत्यंत तीव्र शब्दांत तोफ डागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही खरपूस समाचार घेतला. “उठता बसता सावरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या, पण जे त्यांचा उदोउदो करून स्वतःच्या राजकारणासाठी आणि मतांसाठी वापर करत आहेत, त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत?” असा घणाघाती सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या निवेदनात महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “ज्या भूमीत सावरकर जन्माला आले, त्याच महाराष्ट्रात आज ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’ मधील खोट्या नरेटिव्ह्जवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची चढाओढ लागली आहे. सावरकर हे प्रखर विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध विचार मांडणारे आणि जातीअंतासाठी लढणारे महापुरुष होते. मात्र, आज त्यांच्याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी पडत असून, त्यांच्या प्रतिमांचा वापर करून समाजात केवळ धार्मिक आणि जातीय तेढ पसरवली जात आहे. जिथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलनाचा लढा दिला, तिथे आज जातींवरून डोकी फोडली जात आहेत आणि दुर्दैवाने सत्ताधारी त्याला खतपाणी घालत आहेत.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, सावरकरांना कधीही कोणत्याही व्यक्तीचा अंध उदोउदो करणे मान्य नव्हते. कुठलीही गोष्ट बुद्धीला पटते का, ती तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरते का, हे स्वतः तपासून पाहण्याचे सावरकरांचे ठाम मत होते. आजचा तरुण आणि राजकारणी मात्र उत्सव आणि डीजे संस्कृतीमध्ये गुरफटून गेला आहे.
आपण आपली उज्वल परंपरा विसरत चाललो असून, सत्तेसाठी आसुलेले राजकारणी आणि खोटा प्रचार यावर अवलंबून राहिलो तर महाराष्ट्राचे भविष्य कठीण आहे, असा इशाराही त्यांनी दिला. केवळ दिखाऊपणा न करता, प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासून पाहणे आणि त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच सावरकरांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.



