
नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा कणा असलेल्या नैऋत्य मोसमी पावसाबाबत (Southwest Monsoon) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) एक चिंताजनक अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा देशात सरासरीपेक्षा कमी (Below Normal) पाऊस पडण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ‘मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजा’ची माहिती देताना भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली.
सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता; ‘एल निनो’चा प्रभाव सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, यंदा देशात मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) केवळ ९० टक्के होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये अधिक-उणे ४ टक्के मॉडेल त्रुटी असू शकते. या मान्सून हंगामात ‘एल निनो’ (El Nino) परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने पावसावर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. या काळात ईशान्य भारतात पाऊस सामान्य राहील, तर मध्य भारत, दक्षिण द्विकल्प आणि उत्तर-पश्चिम भारतात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
जून महिना कोरडा जाणार; ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्ट केले की, मान्सूनचा पहिला महिना म्हणजेच जूनमधील सरासरी पाऊस देशात बहुतांश ठिकाणी सामान्यपेक्षा कमीच राहील. केवळ उत्तर-पश्चिम, ईशान्य आणि दक्षिण द्विकल्पातील काही मर्यादित भागांतच सामान्य पाऊस होऊ शकतो. चिंतेची बाब म्हणजे, जून महिन्यात देशातील बहुतांश भागांत कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


