फुगेवाडी विषारी दारू प्रकरण; वायसीएम रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीची महापालिका आयुक्तांकडून विचारपूस…

रुग्णांच्या नातेवाईकांशीही साधला संवाद; महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार

पिंपरी, दि. २९ मे २०२६ (pragatbharat.com) : फुगेवाडी येथील विषारी दारू सेवन केलेल्या रुग्णांना महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. दाखल रुग्णांवर आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देखील आयुक्तांनी दिला.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, तसेच वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयातील उपचार व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने सतर्क राहून या प्रकरणातील आलेल्या रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर तात्काळ आवश्यक सर्व उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दाखल रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या रुग्णांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. महापालिकेच्या वतीने उत्तम वैद्यकीय उपचार रुग्णांवर केले जात आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत सातत्याने या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असून या रुग्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार येण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने कार्यान्वित ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी नातेवाईकांना दिली. काळजी करू नका, महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असा धीर देखील रुग्णांच्या नातवाईकांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

कोट:
“विषारी दारू प्रकरणातील दाखल सर्व रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

कोट:
“वायसीएम रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ञ डॉक्टर आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. या प्रकरणातील दाखल रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीवर रुग्णालय प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. बाधित रुग्णांनी वेळेत वैद्यकीय उपचार करून घेणे अत्यंत आवश्यक असून या बाधितांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.”
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *