
तेहरान (pragatbharat.com) : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात प्राथमिक कराराची (Preliminary Deal) शक्यता वर्तवली जात असतानाच, इराणने यावर मोठी भूमिका मांडली आहे. आपल्या प्रमुख आणि मुख्य अटी पूर्ण केल्याशिवाय अमेरिकेशी कोणत्याही अंतिम शांतता करारावर (Peace Agreement) स्वाक्षरी करणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमधील सामंजस्य कराराचा (MoU) मसुदा अंतिम करण्यात आला असून, आगामी काही दिवसांत त्यावर डिजिटल पद्धतीने स्वाक्षरी केली जाऊ शकते. मात्र, हा केवळ प्राथमिक मसुदा असून अंतिम तोडगा अद्याप निघालेला नाही.
इराणच्या प्रमुख अटी काय आहेत? इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत अमेरिका खालील अटींची पूर्तता करत नाही, तोपर्यंत तेहरान कोणत्याही कायमस्वरूपी कराराला मंजुरी देणार नाही:
- सागरी नाकेबंदी उठवणे : अमेरिकेने इराणवरील आपली नौदलाची नाकेबंदी (Naval Blockade) पूर्णपणे हटवावी.
- गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे : अमेरिकेकडून जप्त करण्यात आलेली इराणची अब्जावधी डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता (Frozen Assets) तात्काळ मुक्त करण्यात यावी.
इराणने स्पष्ट केले आहे कि, त्यांचे आर्थिक आणि सार्वभौम हक्क तसेच प्रतिकूल लष्करी कारवाया थांबवणे या कोणत्याही अंतिम करारासाठी अत्यंत आवश्यक अटी आहेत.
पाकिस्तानची मध्यस्थी (Pakistani Mediators) दुसरीकडे, अमेरिकन प्रशासन आणि पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे पडद्यामागे सुरू असलेल्या या चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानी मध्यस्थांनी दोन्ही बाजू मसुद्यावर सहमत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, वॉशिंग्टनने (अमेरिका) स्पष्ट केले आहे की, कोणताही कायमस्वरूपी राजनैतिक तोडगा हा सर्व पक्षांनी आपापल्या वचनबद्धतेची आणि अटींची कशी अंमलबजावणी केली यावरच अवलंबून असेल.


