पुण्यातील डीजेविरोधी जनचळवळीला ‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा पाठिंबा

नागरिकांच्या आरोग्याच्या किंमतीवर उत्सवाचे पावित्र्य जपता येणार नाही 

पुणे, तारीख २ सप्टेंबर २०२ (pragatbharat.com)गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिवर्धकांच्या वापराविरोधात नागरिकांनी सुरू केलेली जनचळवळ ही केवळ एका उत्सवापुरती मर्यादित नसून, सार्वजनिक आरोग्य, नागरिकांचा शांततेचा अधिकार आणि उत्सव संस्कृतीतील शिस्त यांचा व्यापक विचार करणारी चळवळ आहे, असे मत भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.२) व्यक्त केले.

उत्सव हे समाजाला जोडणारे आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेणारे माध्यम आहे. त्यामुळे गणेशोत्सव किंवा कोणत्याही धार्मिक उत्सवाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, उत्सवाच्या आनंदासाठी वापरल्या जाणाऱ्या ध्वनिवर्धकांचा आवाज जेव्हा मर्यादा ओलांडतो, तेव्हा त्याचा परिणाम केवळ कार्यक्रमस्थळापुरता राहत नाही. परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले तसेच दैनंदिन कामकाज करणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. पुण्यातील नागरिकांनी याच प्रश्नाकडे लक्ष वेधत डीजेच्या अतिरेकाविरोधात आवाज उठवला आहे. ही नागरी चळवळ उत्सवाच्या विरोधात नाही; तर उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या अतिरेकाच्या विरोधात आहे. श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कर्णकर्कश आवाजाची आवश्यकता नसते, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

पुण्याची गणेशोत्सवाची परंपरा ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरापेक्षा उत्सवाच्या मूळ सांस्कृतिक स्वरूपाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. डीजेच्या आवाजाची स्पर्धा करण्याऐवजी पारंपरिक वाद्ये, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून उत्सव अधिक अर्थपूर्ण करता येऊ शकतो.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना गणेशोत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे केलेले आवाहन अत्यंत सकारात्मक आणि स्वागतार्ह आहे, असेही पाटील यांनी म्हटले. पुणे संपूर्ण महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक उत्सवाचे उदाहरण निर्माण करू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्र्यांनी या संवेदनशील विषयाकडे संघर्ष किंवा राजकीय वाद म्हणून न पाहता परंपरा, संस्कृती आणि नागरिकांच्या हिताचा समतोल साधण्याचा दृष्टिकोन मांडला आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका ही प्रशासनासाठीच नव्हे तर समाजासाठीही दिशादर्शक आहे. पुणेकरांनी ही संधी घेत ध्वनिप्रदूषणमुक्त आणि सांस्कृतिक गणेशोत्सवाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न ठेवता सर्व सार्वजनिक उत्सवांसाठी समान नियम आणि समान अंमलबजावणी असावी, अशी मागणीही त्यांनी केली. उत्सवांचा आनंद कायम ठेवत नागरिकांचे आरोग्य, शांतता आणि सार्वजनिक शिस्त यांचे संरक्षण करणे ही शासनाबरोबरच समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.उत्सव मोठा आवाज करून नव्हे, तर मोठ्या सामाजिक सहभागातून मोठा होतो, असे नमूद करीत पाटील यांनी या जनचळवळीला पाठिंबा दर्शवला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *