सायबर चोरट्यांनी दोन ज्येष्ठांना ३ कोटी १४ लाखांना फसविले 

पुणे :(pragatbharat.com) शहरात गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना ’लक्ष्य’ केले जात असल्याचे दिसून आले आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ३ कोटी १४ लाख रूपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहकारनगर व कोथरूड पोलिसांनी चोरट्यांविरूध्द स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून त्यांचा शोध सुरू आहे.   

पहिली घटना सहकारनगर भागातील आहे. सायबर चोरट्यांनी या भागात राहणार्‍या एका तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ७ डिसेंबर २०२५ रोजी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा दिला जाईल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने फेब्रुवारी महिन्यापर्यंत चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी एक कोटी ५२ लाख रुपये जमा केले. मात्र, त्यांना कुठलाच परतावा दिला नाही. फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संगीता देवकाते करत आहेत.

दुसरी घटना कोथरूड परिसरातील आहे. येथील एका ७७ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी संपर्क साधून आपल्या बँक खात्याचा काळ्या पैशाच्या व्यवहारात वापर झाला आहे. तसेच, या प्रकरणातील सुमारे २०० कोटींच्या गैरव्यवहारात आपल्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.  अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे द्यावे लागतील, अशी भीती दाखवून चोरट्यांनी त्यांना पैसे जमा करण्यास भाग पाडले. घाबरून ज्येष्ठ महिलेने वीस दिवसात चोरट्यांच्या खात्यात एक कोटी ६२ लाख रुपये जमा केले. काही दिवसांनी आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित बँकेकडे पाठपुरावा करून चोरट्याच्या खात्यातील रक्कम गोठविण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *