
कोल्हापूर (pragatbharat.com) : गडचिरोलीत नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडणारे कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी आज, २४ एप्रिल रोजी कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध धंद्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचे संकेत दिले आहेत.
निलोत्पल यांच्या नियुक्तीमुळे कोल्हापुरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः महामार्गावरील तस्करी, अवैध सावकारी आणि गर्भलिंग निदान रॅकेटवर ते कडक प्रहार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलीस आता नशिल्या गोळ्यांचा बाजार आणि मटका जुगाराच्या अड्ड्यांविरुद्ध विशेष मोहीम आखण्याच्या तयारीत आहेत. गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक पुन्हा निर्माण करणे, हे त्यांचे पहिले प्राधान्य असल्याचे समजते.

