
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (MMC) ९ रिक्त जागांसाठी आज, २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सुमारे १ लाख ४० हजार नोंदणीकृत डॉक्टर या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या निवडणुकीत एकूण ६० उमेदवार नशीब आजमावत असून, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर डॉक्टरांची गर्दी दिसून येत आहे.
भाजपचा थेट हस्तक्षेप? यंदाची ही निवडणूक केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरती मर्यादित न राहता तिला पूर्णपणे राजकीय रंग प्राप्त झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (IMA) अधिकृत पॅनेलला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. इतकेच नव्हे तर, भाजपच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर प्रत्येकी ५ डॉक्टरांशी संपर्क साधून या विशिष्ट पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मतदानाची वेळ आणि ठिकाण:
- मतदान वेळ: सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
- मतदान केंद्रे: प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान सुरू आहे.
- मतमोजणी: या निवडणुकीची मतमोजणी २९ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील हाफकिन संस्थेत होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची निवडणूक लांबणीवर टाकण्याची याचिका फेटाळल्यानंतर आज ही निवडणूक होत आहे. ७२,००० डॉक्टरांची नावे मतदार यादीतून वगळल्याच्या आरोपांमुळे ही निवडणूक आधीच वादात सापडली होती, त्यात आता सत्ताधारी पक्षाच्या थेट एन्ट्रीने ही लढत अत्यंत चुरशीची बनली आहे.

