
मुंबई (pragatbharat.com) : भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात गाजलेले आणि शेवटची ज्युरी ट्रायल ठरलेल्या ‘के. एम. नानावटी’ प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका ऐतिहासिक बंगल्याची अखेर विक्री झाली आहे. वांद्रे (वेस्ट) येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेला ‘व्हिला पॅलेस’ (Villa Palace) हा बंगला तब्बल ७० वर्षांनंतर विकला गेला असून, या व्यवहाराची रिअल इस्टेट वर्तुळात मोठी चर्चा आहे.
काय आहे ऐतिहासिक संदर्भ? १९५९ मध्ये गाजलेल्या नानावटी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी नौदल अधिकारी के. एम. नानावटी आणि त्यांची पत्नी सिल्व्हिया यांचे हे निवासस्थान होते. याच बंगल्यात या प्रकरणाची अनेक सूत्रे फिरली होती. ७० वर्षांहून अधिक काळ नानावटी कुटुंबाच्या मालकीचा असलेल्या या मालमत्तेची विक्री नानावटी यांच्या वारसांनी केली आहे.
विक्रमी किंमत: हा बंगला आणि त्याखालची जमीन सुमारे ४००० चौरस फूट क्षेत्रावर विस्तारलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्यवहार अंदाजे ८५ ते १०० कोटी रुपयांच्या दरम्यान झाला आहे. एका बड्या विकासकाने (Developer) हा बंगला खरेदी केला असून, या जागी आता एक आलिशान बहुमजली इमारत उभारली जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हेरिटेज वास्तू आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मालमत्तांची विक्री होण्याचे प्रमाण वाढत आहे. जुन्या मुंबईची साक्ष देणारा हा बंगला आता काळाच्या पडद्याआड जाणार असला, तरी या विक्रीमुळे नानावटी प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

