
मुंबई (pragatbharat.com) : लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान “कैसे हराया?” असे विचारत मराठी अस्मितेची एक प्रकारे थट्टा करणाऱ्या सहर शेख आता चक्क मराठी बोलताना दिसणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी सहर शेख यांना त्यांच्याच भाषेत उत्तर न देता एक ‘भन्नाट’ आणि ‘राज’ स्टाईल भेट पाठवली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकी काय आहे मनसेची आयडीया? सहर शेख यांच्या त्या वक्तव्यानंतर मनसे प्रचंड आक्रमक झाली होती. मात्र, यावेळी तोडफोड न करता मनसेने गांधीगिरी आणि ‘मराठी सक्ती’ यांचा सुवर्णमध्य साधला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सहर शेख यांना ‘मराठी शिका’ हे पुस्तक, मराठी मुळाक्षरांचा तक्ता आणि मराठी शब्दकोश कुरिअरद्वारे भेट पाठवला आहे. “जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचे असेल आणि इथल्या राजकारणावर बोलायचे असेल, तर तुम्हाला मराठी भाषा येणे अनिवार्य आहे,” असा सज्जड दमही मनसेने दिला आहे.
सोशल मीडियावर चर्चा: मनसेच्या या उपक्रमाचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नेटकरी याला “मनसेची सात्विक खळ्ळ-खट्याक” असे म्हणत आहेत. “आता सहर शेख यांनी मराठीत उत्तर द्यावे, तरच त्यांचे महाराष्ट्रात स्वागत होईल,” अशा प्रतिक्रिया मनसे समर्थकांकडून येत आहेत.
या प्रकारामुळे सहर शेख आता खरोखरच मराठी भाषेचा सराव करणार का? आणि मनसेच्या या ‘भन्नाट’ आयडीयावर त्यांची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

