
मुंबई (pragatbharat.com) : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातील सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
माजी मंत्री स्व. बाबा सिद्धीकी यांच्या निधनानंतर सिद्धीकी कुटुंबाकडे मोठी जबाबदारी सोपवली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या नावावर चर्चा झाली, मात्र पक्षाने तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवत झिशान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कमी वयात झिशान सिद्धीकी यांच्यावर ही जबाबदारी सोपवून राष्ट्रवादीने नव्या पिढीला वाव देण्याचा संदेश दिला आहे.
या बैठकीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिशान यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. झिशान सिद्धीकी यांच्या उमेदवारीमुळे मुंबईतील राजकीय गणिते आणि विशेषतः अल्पसंख्याक मतपेढीवर पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडीद्वारे आगामी निवडणुकांसाठी आपली रणनीती स्पष्ट केली आहे.

