आंतरराष्ट्रीय तणाव वाढला! अमेरिकेने रोखली इराणची ४२ जहाजे; ६ अब्ज डॉलर्सच्या इंधन व्यापारावर संकट

वॉशिंग्टन/तेहरान (pragatbharat.com) : जागतिक राजकारणात आणि सागरी व्यापारात मोठी खळबळ उडाली असून, अमेरिकन लष्कराने इराणच्या बंदरांना वेढा घालत ४२ जहाजे रोखल्याची घोषणा केली आहे. इराणचा सागरी व्यापार पूर्णपणे ठप्प करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने ही मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेचे सेंट्रल कमांडर ब्रॅड कूपर यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे सध्या ४१ ऑईल टँकर्स अडकून पडले आहेत.

या जहाजांमध्ये अंदाजे ६ कोटी ९० लाख बॅरल तेल असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. अमेरिकेच्या या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कूपर यांनी ही मोहीम अत्यंत यशस्वी असल्याचे सांगत, अमेरिकन नौदल या ब्लॉकडच्या कडक अंमलबजावणीसाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला असून, याला ‘चाचेगिरी’ (Piracy) असे संबोधले आहे. इराणच्या खातम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाने सांगितले की, जहाजांवर खलाशांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित असल्याने इराणी लष्कराने त्यावेळी हस्तक्षेप केला नाही. मात्र, अमेरिकेची ही ‘सागरी दरोडेखोरी’ अशीच सुरू राहिली, तर इराणकडून लवकरच अभूतपूर्व लष्करी कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *