पुण्यात बैलगाडा शर्यतीत भीषण अपघात; पळालेला बैल पकडताना तरुणाचा मृत्यू, करंदी केसरी मैदानात शोककळा

पुणे (pragatbharat.com) : शिरूर तालुक्यातील करंदी येथे आयोजित ‘करंदी केसरी २०२६’ या बैलगाडा शर्यतीदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शर्यतीचा बैल पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला बैलाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश महादू फटांगडे (वय ३५) असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमका थरार काय घडला? मिळालेल्या माहितीनुसार, करंदी येथे बैलगाडा शर्यतीचे मोठे आयोजन करण्यात आले होते. शर्यत सुरू असताना, कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा धावून घाटाबाहेर आला. घाटाबाहेर आलेले बैल वेगाने धावत असताना त्यांना पकडण्यासाठी प्रकाश फटांगडे हे पुढे सरसावले. मात्र, धावणाऱ्या बैलाचा वेग इतका प्रचंड होता की, प्रकाश यांचा अंदाज चुकला आणि बैलाची त्यांना थेट भीषण धडक बसली.

जागीच संपलं सगळं: बैलाच्या धडकेमुळे प्रकाश हे हवेत उडून जोरात जमिनीवर कोसळले. ही धडक इतकी जोरात होती की, प्रकाश यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेनंतर परिसरात सन्नाटा पसरला असून, ‘करंदी केसरी’ मैदानावर शोककळा पसरली आहे. बैलगाडा शर्यतीमधील सुरक्षेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *