परतूरचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन; जालना जिल्ह्यावर शोककळा, पहाटे हृदयविकाराचा झटका

जालना (pragatbharat.com) : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने जालना जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

राजकीय कारकीर्द: सुरेशकुमार जेथलिया यांनी २००९ साली परतूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील विकासकामांसाठी मोठे योगदान दिले होते. सुरुवातीला काँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मनमिळावू स्वभाव आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

अशी घडली घटना: मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास त्यांना राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परतूर आणि जालना परिसरातील समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. जेथलिया यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली असून, एक अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *