प्रताप सरनाईक यांचा एसटी स्टँडवर ‘ऑन द स्पॉट’ दणका; चढ्या दराने पाणी विकणाऱ्या स्टॉलवाल्याला धारेवर धरले

पुणे (pragatbharat.com) : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध एसटी बस स्थानकांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. एका बस स्थानकावर प्रवाशांची लूट होत असल्याचे निदर्शनास येताच सरनाईकांनी थेट स्टॉलवाल्याला धारेवर धरले आणि एका महिला प्रवाशाला तिचे पैसे परत मिळवून दिले.

स्टॉलवाल्याची केली कानउघाडणी: पाहणी दरम्यान मंत्री सरनाईक एका स्टॉलजवळ थांबले असता, तिथे पाण्याची बाटली छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त दराने विकली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने संबंधित प्रवाशाला विचारले, “तुम्ही पाण्याच्या बाटलीचे किती रुपये दिलेत?” प्रवाशाने जादा पैसे घेतल्याचे सांगताच सरनाईकांनी स्टॉलधारकाला कडक शब्दांत सुनावले. मंत्र्यांच्या या धाकामुळे स्टॉलवाल्याने तात्काळ त्या महिला प्रवाशाला वाढीव पैसे परत केले. “प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.

अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती: केवळ स्टॉलच नव्हे, तर बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि अस्वच्छता पाहून मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रवाशांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ज्या ठिकाणी कामात दिरंगाई आणि अस्वच्छता दिसून आली, तिथे त्यांनी उपस्थित एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भररस्त्यात कानउघाडणी केली. स्थानकांचा कायापालट करण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *