
वॉशिंग्टन/काराकास (pragatbharat.com) : अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन्ही देशांमधील राजनैतिक तणावामुळे खंडित झालेली विमानसेवा तब्बल सात वर्षांच्या दीर्घ अंतराळानंतर पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे. अमेरिकन एअरलाईन्सचे पहिले व्यावसायिक विमान मियामीहून व्हेनेझुएलाची राजधानी काराकास येथे काल सुरक्षितपणे उतरले. २०१९ पासून दोन्ही देशांमधील थेट हवाई संपर्कावर घालण्यात आलेली बंदी आता अधिकृतपणे उठवण्यात आली आहे.
सुरक्षा कारणास्तव होती बंदी: राजकीय अस्थिरता आणि सुरक्षाविषयक कारणांमुळे अमेरिकेने २०१९ मध्ये व्हेनेझुएलासाठी प्रवासी आणि मालवाहू विमान उड्डाणांवर बंदी घातली होती. मात्र, आता हवाई सुरक्षा परिस्थितीत झालेल्या सुधारणांचा आढावा घेतल्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
आर्थिक आणि सामाजिक संबंधांना बळ: या विमानसेवेच्या पुनारंभामुळे केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार आणि ‘पीपल-टू-पीपल’ कनेक्टिव्हिटीलाही मोठा वाव मिळणार आहे. दीर्घकाळ रखडलेल्या प्रवासाच्या अडचणी दूर झाल्याने दोन्ही देशांतील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ही घडामोड आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध सामान्य होण्याचे संकेत मानले जात आहेत.

