निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष; ९० लाख मतदारांची नावे कापली, संजय राऊतांचा पाच राज्यांच्या निकालांवर खळबळजनक आरोप

मुंबई (pragatbharat.com) : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने जवळपास ९० लाख मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा ‘मित्रपक्ष’ असल्यासारखा वागत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “सुरुवातीचे कल हे केवळ पोस्टल मतदानाचे असून चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून वेळ आहे. मात्र, भाजपने पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी सर्व थराला जाऊन प्रयत्न केले आहेत. ९० लाख मते एकाच वेळी डिलीट केली जातात, तेव्हा त्याचा थेट परिणाम निकालावर होतो. निवडणूक आयोगाला हाताशी धरून सीसीटीव्ही गायब करणे, वीज कापणे यांसारखे हातखंडे भाजप वापरत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना राऊत पुढे म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. सरकार केवळ निवडणुकांमध्ये तळ ठोकण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, या निवडणुका केवळ प्रतिकात्मक असून तेथे मुख्य पक्षांनी उमेदवार दिलेले नाहीत, तरीही निकालांचे विश्लेषण चुकीच्या पद्धतीने केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *