
अबुजा (नायजेरिया) (pragatbharat.com) : माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नायजेरियातून समोर आली आहे. येथील डेल्टा स्टेट मध्ये आयोजित ‘अलुए-डो’ (Alue-Do) उत्सवा दरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर महिलांचा पाठलाग करून त्यांच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आले. या संतापजनक घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अनेकांनी याला ‘रेप फेस्टिव्हल’ (बलात्कार उत्सव) असे संबोधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा उत्सव प्रजननाशी संबंधित असून तो येथील ओरामुडू समुदायाकडून साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या उत्सवाच्या नावाखाली विकृत प्रकार पाहायला मिळाले. सार्वजनिक ठिकाणी पुरुषांच्या झुंडीने महिलांना घेरले, त्यांचे कपडे फाडून त्यांना निर्वस्त्र केले आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, तिथे उपस्थित असलेल्या गर्दीने हा प्रकार रोखण्याऐवजी आरोपींना अधिक चिथावणी दिली. यामध्ये प्रौढ पुरुषांसह काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
या घटनेतील एका पीडित विद्यार्थिनीने आपली आपबीती सांगताना म्हटले की, “मी मोटारसायकलवरून जात असताना गर्दीने मला पाहिले आणि ‘तिला पकडा’ असा ओरडा सुरू केला. लोक मधमाश्यांसारखे माझ्या अंगावर धावून आले, माझे कपडे फाडले आणि माझ्या शरीराची विटंबना केली. मी मदतीसाठी ओरडत होते, पण कोणीही पुढे आले नाही.” अखेर एका व्यक्तीने हस्तक्षेप केल्यामुळे तिची सुटका झाली.
डेल्टा स्टेट पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत एका स्थानिक नेत्यासह चार तरुणांना अटक केली आहे. महिला हक्क संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, अशा हिंसक मानसिकतेमुळे समाजाची अधोगती होत असल्याची भीती व्यक्त केली आहे. नायजेरिया सरकारवर आता या दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढत आहे.

