“FIR शिवाय चौकशी म्हणजे केवळ दिखावा” दक्ष नागरिक संघाची महापालिकेतील ₹६० कोटींच्या कथित घोटाळ्यावर तीव्र भूमिका

पिंपरी (pragatbharat.com): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ₹६० कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याबाबत गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त यांनी तात्काळ गुन्हा (FIR) नोंद करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि इतर जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी दक्ष नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. अजित बोराडे यांनी केली आहे. पिंपरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दक्ष नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. अजित बोराडे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ₹६० कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून महापालिका आयुक्तांना नोटिस दिलेली असून केवळ अंतर्गत चौकशी पुरेशी नसून तात्काळ गुन्हा (FIR) नोंद करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका प्रशासनाला ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
स्थायी समिती व महासभेत बनावट ठराव मंजूर करून त्याच्या आधारे कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. प्राथमिक चौकशी अहवालामध्ये अशा किमान १४ बनावट ठरावांची नोंद झाल्याचे समोर आले आहे.
ॲड. बोराडे यांनी स्पष्ट केले की, FIR नोंद झाल्याशिवाय पोलीस यंत्रणा कार्यान्वित होत नाही, परिणामी पंचनामा, कागदपत्रांची तसेच फॉरेन्सिक तपास यांसारख्या अत्यावश्यक प्रक्रिया होऊ शकत नाहीत. त्यामुळे केवळ “अंतर्गत चौकशी” हा प्रकार केवळ वेळकाढूपणा असून जनतेची दिशाभूल करणारा आहे.
ॲड. बोराडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, एकीकडे महानगरपालिका व राज्य शासन नागरिकांसाठी आवश्यक सुविधा जसे की रस्ते, पदपथ, पाणीपुरवठा यासाठी निधीची कमतरता असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे अशा प्रकारचा ₹६० कोटींचा कथित अपहार अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या पैशांचा गैरवापर आहे.
त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा या प्रकरणात करदात्यांच्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचा आरोप असताना व महापालिकेचे स्वत:चेच कर्मचारी यामध्ये सहभागी असल्याचा आरोप होत असताना महानगरपालिका स्वतःची चौकशी स्वतःच कशी करू शकते व अशी चौकशीला निष्पक्ष व कायदेशीर कसे म्हणता येईल ? FIR दाखल करण्यात होणारा विलंब हा पुरावे नष्ट करण्यास व आरोपींना वेळ देण्यास कारणीभूत ठरू शकतो, जे अत्यंत गंभीर आहे.
ॲड. बोराडे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत:

→पीसीएमसी नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?
→FIR दाखल न करण्यासाठी कोणाकडून दबाव टाकला जात आहे?
→या प्रकरणातील संपूर्ण सत्य जनतेसमोर का आणले जात नाही?

  दक्ष नागरिक संघाने या प्रकरणात तातडीने FIR नोंद करून स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. यासाठी जर या कालावधीत FIR नोंद करण्यात आली नाही, तर ॲड.  अजित बोराडे हे स्वतः न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

ॲड. अजित बोराडे
अध्यक्ष, दक्ष नागरिक संघ, महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *