चीनमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २६ जणांचा मृत्यू, ६१ जखमी, राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी दिले चौकशीचे आदेश

बीजिंग (pragatbharat.com) : मध्य चीनमधील हुनान प्रांतात असलेल्या एका फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात २६ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाले आहेत. लियुयांग शहरात असलेल्या ‘हुआशेंग फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्प्ले कंपनी’च्या प्रकल्पात काल दुपारी ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ३ किलोमीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणाजवळ ‘ब्लॅक पावडर’ची दोन मोठी कोठारे असल्याने दुसरा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी ४८० हून अधिक जवान आणि ३ रोबोट्सची मदत घेतली जात आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आणि दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कंपनीच्या जबाबदार व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, लियुयांग शहर हे जगातील सर्वात मोठे फटाके उत्पादन केंद्र मानले जाते. या भीषण अपघातामुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *